भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी मोठी : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, दिघोरी (मोठी) येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सुनील खंडाईत होते. प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान विभाग प्रमुख मानकर सर, शरद आर. साळवे, प्रणय वाहाने, वरिष्ठ शिक्षक कोडापे सर, कुणाल गोटेफोडे, पंकज हुमे, चौधरी बाबूजी, कोरे ताई, खोडकरजी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माँ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आशीर्वाद घेतला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुनील खंडाईत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त, गुरूंचा आदर आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.”
विज्ञान विभाग प्रमुख मानकर सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “संघर्ष आणि कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. आपल्या विद्यालयात वर्षभर विविध शैक्षणिक, वैज्ञानिक, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविले जातात. आपल्या शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत असून गाव व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करत आहेत. या यशाचा आदर्श घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च ध्येय गाठावे.” कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शरद आर. साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा वारसा जपण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.