भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील ‘मानस अॅग्रो अँड इन्फ्रा लि. युनिट-४’ साखर कारखाना प्रशासनाकडून कर्मचाºयांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच शेतकºयांचे उसाचे चुकारे थकवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शेतकरी लंकेश तिजारे, सचिन मोहतुरे, अमोल मसराम, रोशन बांते, संजय झंझाड, पत्रकार अमित रंगारी उपस्थित होते. स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी मानस अॅग्रोचे व्यवस्थापक रविशंकर बोरकर, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साखर कारखाना संचालक नितीन गडकरी, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते व भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांना २३ जुलै २०२६ रोजी पत्र पाठवून कारखान्याच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली आहे.
साखर कारखान्यातील तब्बल ५२ कर्मचाºयांच्या नावे ‘बँक आॅफ इंडिया’ (शाखा भंडारा) मधून कर्मचाºयांना अंधारात ठेवून कर्ज (लोन) काढण्यात आले. ही रक्कम कर्मचाºयांच्या खात्यावर जमा न करता, कारखान्याच्या व्यवस्थापकीय समितीने परस्पर युनिटच्या अधिकृत खात्यात वळती केली. या आर्थिक फसवणुकीत बँक व्यवस्थापकही सामील असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. राष्ट्रीयीकृत बँक आणि कारखान्याच्या संगनमताने झालेल्या या फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या पीडित कर्मचाºयांनी कारखाना प्रशासनाविरोधात थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाºयांचे मागील ८ महिन्यांचे वेतन थकीत असून, गेल्या ३ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी आणि विम्याचा हप्ता कंपनीने भरलेला नाही. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२६ पासून शेतकºयांच्या उसाचे चुकारे (पेमेंट) प्रलंबित असल्यामुळे शेतकरी आर्थिकअडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकरी व कर्मचाºयांना कधी न्याय मिळतो, याकडे आता संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.