लाखांदुर पंचायत समितीत ‘मनमानी’ चा कारभार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : पंचायत समिती लाखांदूर येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या कथित अनियमित उपस्थितीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून निघून जात असल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांची कामे रखडत असून, वारंवार हेलपाटे मारूनही नागरिकांना निराश होऊन परतावे लागत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पंचायत समिती लाखांदूरचे गटनेते मंगेश राऊत यांनी केली आहे.

गटनेते मंगेश राऊत यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून ते पंचायत समितीच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. या काळात अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे विविध शासकीय योजनांची कामे विलंबाने होत असून नागरिकांना विनाकारण कार्यालयाच्या फेºया माराव्या लागत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, काही अधिकारी व कर्मचारी दुपारी सुमारे चार वाजल्यापासूनच बिअर बारमध्ये बसलेले असल्याची माहितीही त्यांच्या निदर्शनास असल्याचे यावेळी त्यांनी केला. हा विषय त्यांनी अनेक वेळा पंचायत समितीच्या सभागृहातउपस्थित केला असून, पंचायत समितीचे सभापती यांच्या निदर्शनासही वारंवार आणून दिला आहे. मात्र, यानंतरही कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये शिस्तीचा अभाव वाढत चालल्याचा आरोप त्यांनी केला.

मंगेश राऊत यांनी पुढे सांगितले की, कार्यालयातून बाहेर पडणाºया प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाने कुठे, कोणत्या कारणासाठी आणि किती वेळासाठी जात आहे, याची नोंद ‘हलचल रजिस्टर’ मध्ये अनिवार्य करण्यात यावी, अशी त्यांनी वारंवार मागणी केली. ही सूचना प्रशासनासह सभापतींनाही अनेकदा दिली; मात्र आजपर्यंत त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.याकरीता, “कार्यालयीन वेळेतच कार्यालय पडले ओस ” या वृत्तानंतर या संपूर्ण प्रकाराकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, पंचायत समिती प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या कार्यालयातच शिस्तीचा अभाव दिसत असेल, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कसा टिकणार? हा प्रश्न आता लाखांदूर तालुक्यात जोरदारपणे उपस्थित होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *