महिलांच्या पुढाकारात पार पडला बाहुला-बाहुलीचा शाही विवाह सोहळा
अभिमन ठाकरे / भंडारा पत्रिका
लाखांदूर : मांडव सजला, बँडबाजासह वऱ्हाडी आले, लग्नघटी समीप आली. लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील महिला मंडळ ही ३१ वर्षांपासून परंपरा सुरू आहे. आधुनिकतेच्या झगमगाटात जुन्या परंपरा आणि लोकसंस्कृती लोप पावत असताना, लाखांदूर तालुक्यातील पुयार गावाने मात्र आपली एक अनोखी संस्कृती आजही जिवंत ठेवली आहे. पुयार येथे गेल्या ३१ वर्षांपासून जपली जाणारी ‘बाहुला-बाहुलीच्या लग्नाची’ परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे, केवळ मुलांचा खेळ न पाहता, गावातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विवाह सोहळा अगदी खऱ्या लग्नाप्रमाणे थाटामाटात घडवून आणला.
पुयार गावात गेल्या तीन दशकांपासून (३१ वर्षे) ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. दरवर्षी गावातील नागरिक आणि विशेषतः महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आजची तरुण पिढी मोबाईल आणि डिजिटल दुनियेत हरवत असताना त्यांना आपल्या मातीची, संस्कृतीची आणि जुन्या खेळांची ओळख व्हावी, या उद्देशाने गावाने हा वारसा अत्यंत अभिमानाने जतन केला आहे.
चारचाकीवरून निघाली ‘पप्पू’ची वाजतगाजत वरात!
सोमवारी, ०६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता या विवाहाची लगबग सुरू झाली. या अनोख्या लग्नात बाहुल्याचे नाव ‘पप्पू’ तर बाहुलीचे नाव ‘साक्षी’ ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, नवरदेव पप्पूची चक्क चारचाकी गाडीवरून गावातून वाजतगाजत वरात काढण्यात आली. या वरातीत गावातील अबालवृद्धांपासून ते नवरूणांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला आणि पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला. विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित सर्वांसाठी अन्नाचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येत वरुणराजाला “लवकर ये आणि धरणीमाता सुजलाम सुफलाम कर,” असे सामूहिक साकडे घातले.
हळदीपासून ते सप्तपदीपर्यंत…
या लग्नाची पूर्वतयारी काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. एका बाजूला बाहुल्याचे (नवरदेवाचे) घर तर दुसऱ्या बाजूला बाहुलीचे (नवरीचे) घर सजवण्यात आले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी महिलांनी पारंपरिक लग्नागीते आणि सुवासिक गाणी गात बाहुल्या-बाहुलीला हळद लावली. लग्नाच्या दिवशी प्रत्यक्ष अक्षता मुहूर्त साधून मंगलाष्टका म्हणण्यात आल्या. महिलांनी आणि गावकऱ्यांनी या जोड्यावर अक्षता आणि फुलांचा वर्षाव केला. खऱ्या लग्नाप्रमाणेच बाहुलीला रुखवत (माहेरची भेट) देण्यात आला आणि सर्व पारंपरिक विधी पार पाडण्यात आले. तसेच याप्रसंगी बाहुल्याला सजवून बैठकीत बसवण्यात आली. यावेळी डीजे किंवा पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिला आणि मुलांनी मनसोक्त डान्स करत आनंद साजरा केला.
महिलांचा मुख्य पुढाकार आणि वऱ्हाडींचे भोजन..!
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील महिलांचा असलेला सक्रिय सहभाग. रुखवताचे साहित्य तयार करण्यापासून ते जेवणाचा बेत आखण्यापर्यंत सर्व जबाबदारी महिला मंडळाने सांभाळली. लग्नासाठी संपूर्ण गावातून लोकवस्तू आणि अन्नधान्य गोळा करण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर सर्व वऱ्हाडी आणि चिमुकल्यांसाठी भोजनाची पंगत देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या आणि पारंपरिक सोहळ्याचे नेटके नियोजन गावकऱ्यांनी केले होते. या सोहळ्याला पुयारचे सरपंच शैलेश रामटेके, संचालक तेजराम दिवठे, सदस्य माया दिवठे, सुर्नदा नाकतोडे, निलेश नाकतोडे, सौरभ राऊत, भागवत लांजेवार, गोपेश्वर देशमुख, मारोती पारधी, नानू राऊत, संतोष पारधी, राजेश दुपारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
“आम्ही गेल्या ३१ वर्षांपासून ही परंपरा पाहत आणि जपत आलो आहोत. हा केवळ लहान मुलांचा खेळ नाही, तर संपूर्ण गावाला एकत्र आणणारा एक सण आहे. आमच्या गावातील महिला दरवर्षी यात हिरिरीने भाग घेतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
– पुष्पा तलभले, ग्रामस्थ महिला.