बिबट्याशी दोन हात करून शेतकरी बचावला!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : तालुक्यातील मांढळ शेतशिवारात धान कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकºयावर शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातल्याने आज, दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास थरारक घटना घडली.

मांढळ येथील शेतकरी राहुल प्रकाश देशपांडे (वय ४४) यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. बिबट्याशी झालेल्या झटापटीत त्यांच्या मांडीवर मोठ्या जखमा झाल्या असून छातीसह शरीराच्या इतर भागांवर नखांचे ओरखडे आले आहेत. मांढळ ते भागडी रस्त्यापासून सुमारे ५०० ते ७०० मीटर आत असलेल्या शेतात देशपांडे धान कापणीसाठी गेले होते. हार्वेस्टरने कापणी-मळणी करावयाची असल्याने बांधालगत असलेले धान बाजूला करीत असताना अचानक समोरून बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली.

हल्ल्याची चाहूल लागताच त्यांनी प्रतिकार केला. काही क्षण दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. शरीराने मजबुत असलेल्या देशपांडे यांनी सर्व शक्तीनिशी मुकाबला केल्याने बिबट्याला माघार घ्यावी लागली. त्यांच्या आरडाओरडीने शेजारील शेतात काम करणारे मजूर धावत आले. माणसांची चाहूल लागताच बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला. जखमी देशपांडे यांना प्रथम सरांडी (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यातआले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसराची पाहणी केल्यानंतर आढळलेल्या पाऊलखुणांवरून हल्लेखोर प्राणी वाघ नसून बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही. त्यानंतर परिसरात फटाके वाजवून बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *