भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात विशेष आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासातील स्वर्गीय अजितदादांचे अमूल्य योगदान लक्षात घेता, राज्य सरकारने त्यांच्या जयंतीचा समावेश अधिकृतपणे राज्यातील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. हा त्यांच्या अलौकिक कायार्चा आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा फार मोठा सन्मान आहे.
स्वर्गीय अजितदादांची सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, त्यांची सहकारावरील मजबूत पकड आणि या क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय सर्वश्रुत असून संपूर्ण महाराष्ट्र आणि सहकार क्षेत्र त्यांचे हे योगदान कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्व आजीमाजी पदाधिकारी, संचालक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे आणि समस्त संचालक मंडळांनी केले आहे.