बारव्हा येथील घटना
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
पारडी : मागील ८ महिन्यांमपासून स्वतःच्या राहत्या घरात एकटेच राहत असलेल्या एका नियमित मद्यपी व्यक्तीचा मृतदेह सांगाड्याच्या स्वरूपात आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बारव्हा गावात उघडकीस आली. या घटनेत बारव्हा येथील किसन झिंगर कोरतक (४२) या नियमित मद्यपी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीचा सांगाडा मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू अंदाजे एक महिन्यापूर्वी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या सूत्रानुसार, मृत व्यक्ती मागील काही वर्षांपासून नियमित मद्यपी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळेच त्याच्या पत्नीने ३ वर्षांपूर्वी पतीला सोडले आणि ती माहेरी निघून गेली. यानंतर मृत व्यक्ती आपल्या ७० वर्षीय आईसह स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होती. दरम्यान, ८ महिन्यांपूर्वी वृद्ध आईची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी व विश्रांतीसाठी तो तालुक्यातील मेंढा/चप्राड येथे राहणाऱ्या आपल्या मुलीच्या गावी गेला होता. त्यामुळे मृत व्यक्ती आपल्या राहत्या घरात एकटाच राहत होता.
मिळलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती नियमित मद्यपी असल्यामुळे शेजारील नागरिकही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असत. दरम्यान, त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत खाटेवर झोपत होता. मद्यधुंद अवस्थेत व भुकेल्या पोटी झोपल्यामुळे अंदाजे एक महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी वृद्ध आई मुलीच्या गावीतून स्वतःच्या घरी परतली असता तिला घराचा दरवाजा आतून बंद आढळला. तिने कसेबसे दार दरवाजा उघडून पाहिले असता तिचा मुलगा खाटेवर झोपलेल्या अवस्थेत दिसला. तिने खाटेवर झोपलेल्या मुलाला हाक मारली, परंतु त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने जवळ जाऊन निरखून पाहिले असता मुलाचा मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याच्या तिच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती आईने शेजाऱ्यांसह स्थानिक दिघोरी मोती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फोरेंसिक विभागाला याची माहिती दिली आणि पंचनाम्याची कारवाई केली.
दरम्यान, घरामध्ये जवळपास एक महिना आधी मृत्यू होऊनही मृतदेहाचा दुर्गंधी न सुटल्याने आणि तब्बल एक महिन्यानंतर सांगाडा आढळल्याने या अजब घटनेबाबत परिसरात विविध चर्चांना उधान आले आहे.