भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मानेगाव येथे सुरू असलेल्या भूमिगत पुलाच्या बांधकामामुळे लाखनीसाकोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून सीमा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो वाहनचालकांना बसत आहे. पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता सुरू करण्यात आलेल्या कामामुळे मानेगावपासून लाखनीपर्यंत ट्रक, बस आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे लाखनीसालेभाटा-निलगोंदी मार्गे साकोलीकडे जाणाºया वाहनांचीही प्रचंड गर्दी झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भूमिगत पुलाच्या कामासाठी मुख्य रस्ता खोदून त्याच मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहने, बस, कार आणि दुचाकी एकाच अरुंद मार्गाने मार्गक्रमण करत असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे.
एखादे वाहन बंद पडले किंवा तांत्रिक बिघाड झाला तर काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३० ते ६० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत. शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. रस्त्यावर चिखल, खोल खड्डे आणि घसरडा मार्ग यामुळे दुचाकीस्वारांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे संतुलन बिघडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. दुसरीकडे पाऊस नसलेल्या दिवसांत खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून समोरचे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुका प्रशासनाने धूळ नियंत्रणासाठी टँकरद्वारे नियमित पाणी फवारणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कंपनीने पाच टँकरद्वारे पाणी टाकत असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पाणी फवारणी होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करून जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यावर तैनात करण्यात आलेले काही सुरक्षा रक्षकही अपुरे व अकुशल असल्याची तक्रार असून वाहनचालकांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याऐवजी गोंधळ अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना, पर्यायी रस्ता, योग्य वाहतूक नियोजन आणि धूळ नियंत्रण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, मानेगावपासून लाखनीपर्यंत ट्रकांच्या रांगा लागल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली असून लाखनीसालेभाटा-निलगोंदी मार्गे साकोलीकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाºया संबंधित बांधकाम कंपनीवर कठोर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकावे, तसेच तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.