शाळा,रस्ते,आरोग्य,कचरा अन निधीच्या हिशोबावरून युवकांचा ग्राम पंचायतीला घेराव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : गावातील विविध मूलभूत प्रश्न, विकासकामांचे नियोजन आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावरून दिघोरी मोठी येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. ग्रामसभेला शेकडो नागरिक उपस्थित होते. विशेषत: युवकांनी गावातील प्रश्नांचा पाढाच वाचत ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत थेट जाब विचारला.ग्रामसभेत गावातील शाळेची समस्या, कचरा वाहतूक करणाºया घंटागाडीची समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी, गावातील रस्त्यांची दुरवस्था तसेच पोस्ट आॅफिस स्थलांतराला विरोध या प्रश्नांवर जोरदार चचाझाली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर ठोस कार्यवाही कधी होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.१५वा, १६वा वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब मागितला युवकांनी ग्रामसभेत १५ वा वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब, १६वा वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन, सामान्य फंडाचा वापर, घरकुल योजनेचीअंमलबजावणी तसेच रोजगार हमी योजनेतील कामे आणि मजुरांना मिळणाºया पैशांचा मुद्दा उपस्थित केला.

गावाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना मूलभूत समस्या अद्यापकायम का आहेत? निधीचे नियोजन नेमके कसे केले जाते? झालेल्या कामांवर किती खर्च झाला? याबाबत ग्रामस्थांसमोर स्पष्ट माहिती मांडण्याची मागणी करण्यात आली.‘प्रश्न मांडतो, पण कामे होत नाहीत’ ग्रामपंचायत सदस्यांनीही ग्रामसभेत आपली नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रश्न मांडून विकासकामांसाठी पाठपुरावा करूनही सांगितलेली कामे प्रत्यक्षात होत नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या पद्धतीवरच ग्रामसभेत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.राजीनाम्याची मागणी झाली; मात्र अधिकृत भूमिका अस्पष्ट. ग्रामसभेदरम्यान काही नागरिकांनी सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच उपसरपंच विजय खोब्रागडे यांच्यासह पद्माकर चेटुले, सत्यपाल पेंदाम, महादेव कांबळे आणि व्यंकट मेश्राम या ग्रामपंचायत सदस्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची भूमिका मांडली.संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी ‘आम्ही सांगितलेली कामे होत नाहीत, त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत,’ अशी भूमिका ग्रामसभेत व्यक्त केल्याचे समोर आले. मात्र, ग्रामसभा पार पडून बातमी प्रसिद्ध होईपर्यंत या राजीनाम्यांबाबत नेमकी कोणती प्रशासकीय कार्यवाही झाली, ते स्वीकारण्यात आले आहेत की नाही किंवा पुढील प्रक्रिया काय आहे, याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची सद्यस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

पोस्ट आॅफिस स्थलांतराला ग्रामस्थांचा विरोध गावातील पोस्ट आॅफिस स्थलांतराच्या मुद्द्यावरही ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. गावातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याने पोस्ट आॅफिस गावातच कायम ठेवावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर शाळा, आरोग्य, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि घरकुल यांसारखे प्रश्न ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असताना त्यावर सातत्याने चर्चा होऊनही प्रत्यक्षात अपेक्षित कामे होत नसल्याची नाराजी ग्रामसभेत व्यक्त झाली. ग्रामसभेत युवकांनी केवळ प्रश्न उपस्थित करून थांबण्याऐवजी निधीचा हिशोब, विकासकामांचे नियोजन आणि प्रत्यक्ष झालेल्या कामांचा तपशील ग्रामस्थांसमोर स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे ग्रामसभेतील वातावरण चांगलेच तापले.दिघोरी मोठी येथील ग्रामसभा त्यामुळे केवळ औपचारिक चर्चा न ठरता गावाच्या मूलभूत प्रश्नांचा थेट जाब विचारणारी ठरली. शाळा, आरोग्य, रस्ते, स्वच्छता, पोस्ट आॅफिस आणि विविध विकासनिधींच्या नियोजनासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर आता ग्रामपंचायतीकडून प्रत्यक्ष काय कार्यवाही होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेल्या राजीनाम्याच्या भूमिकेबाबत अधिकृत निर्णय किंवा प्रशासनाची स्पष्ट भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याने या विषयाकडेही ग्रामस्थांचे लक्ष आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *