भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
तुमसर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), तुमसर यांचे नाव बदलून “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर” असा शासन निर्णय तात्काळ जारी करण्याच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे लेखी पत्र शनिवारी देण्यात आले असले, तरी कौशल्य विकास विभागाच्या उदासीनतेमुळे कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने नियोजित बेमुदत आमरण उपोषण सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी करण्यावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
तुमसर येथील आयटीआयच्या नामांतराचा प्रस्ताव व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (मुंबई) आणि प्रादेशिक कार्यालयामार्फत शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम शासन निर्णय निर्गमित न झाल्याने स्वराज्य युवा एकता फाउंडेशनतर्फे ५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास ५ ऑक्टोबरपासून आयटीआयच्या प्रांगणात बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या आंदोलनाची दखल घेत आयटीआय तुमसरचे प्राचार्य केतन सोनपिंपरे यांनी सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांना लेखी पत्र दिले. यामध्ये नामांतराचा विषय हा धोरणात्मक व शासन स्तरावरील असल्याने संचालनालयमार्फत मंत्रालयात आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार व पाठपुरावा सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा निर्णय उच्च स्तरावरून होणारा असल्याने ५ ऑक्टोबरपासून प्रस्तावित असलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती प्रशासनाने पत्राद्वारे केली आहे.
प्रशासकीय पत्र आणि भंडारा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेशकुमार गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक यानंतरही आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही कौशल्य विकास विभागाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आयटीआय कडून मिळालेल्या लेखी उत्तराने समाधान न झाल्यामुळे सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे आयटीआय प्रांगणात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे यांनी शासनाने या विषयाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी आयटीआय तुमसरचे प्राचार्य केतन सोनपिंपरे, शिल्प निर्देशक संजय लोंढे, कनिष्ठ लिपिक चेतना पराते यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, हर्ष कठाणे, ऋषभ नागोसे, मयूर वेडे, सुलोचना कुंभारे, हर्षल चावके, सारंग झंझार्ड व निशांत चावके प्रामुख्याने उपस्थित होते.