भंडारा पत्रिका/प्रतिनिधी बारव्हा : डोळ्यांसमोर उभे असलेले धानपीक, पिकाला पाण्याची नितांत गरज आणि दुसरीकडे सिंचनासाठी धरणातून सोडलेले पाणी शेतापर्र्यंत पोहोचत नसल्याची हतबल करणारी परिस्थिती… अशी अवस्था सध्या बारव्हा व परिसरातील अनेक शेतकºयांची झाली आहे. शेतातील धानपीक गर्भावस्थेत असून, या निर्णायक टप्प्यावर पिकाला एका पाण्याच्या पाळीची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकºयांची ही गरज लक्षात घेऊन इटियाडोह पाटबंधारे विभागाने गेल्या १५ दिवसांपासून सिंचनासाठी पाणी सोडले आहे. मात्र, मुख्य व उपनहरांची वेळेत साफसफाई न झाल्याने हे पाणी शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार शेतकºयांकडून केली जात आहे. परिणामी, धरणातून पाणी सोडूनही बारव्हा परिसरातील हजारो शेतकºयांच्या पदरी निराशा पडत असल्याचे चित्र आहे.
शेती हा निसर्गाच्या लहरींवर अवलंबून असलेला व्यवसाय. कधी पावसाची प्रतीक्षा, तर कधी सिंचनाच्या पाण्यासाठी धावपळ, अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या पिकाला जगवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. सध्या धानपिकासाठी पाण्याची गरज वाढली असताना बारव्हा परिसरातील शेतकºयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इटियाडोह धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले असले, तरी नहरांच्या माध्यमातून त्याचे योग्य वितरण होत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे. मुख्य नहरांपासून उपनहरांपर्यंत पाणी वाहून नेण्याची व्यवस्था सुरळीत नसल्याने काही भागांत पाणी अडून राहत आहे, तर शेवटच्या टोकावरील शेतकºयांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे धरणातून पाणी सोडले जात असल्याची माहिती मिळत असताना दुसर- ीकडे आपल्या शेतात पाणी कधी पोहोचणार, या विवंचनेत शेतकरी दिवस काढत आहेत. पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही, तर वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती त्यांना सतावत आहे.
सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्याइतकेच ते प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे असते. यासाठी मुख्य नहर, उपनहर आणि वितरिकांची नियमित साफसफाई करणे, गाळ काढणे तसेच पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूरकरणे आवश्यक असते. या कामांमध्ये दुर्लक्ष झाल्यास पाणीवाटपाच्या संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने हेड टू टेल म्हणजेच नहराच्या सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी गावागावांत पाणी वापर संस्था आणि समित्यांची व्यवस्था केली आहे. नहरांची देखभाल, साफसफाई आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे ही या व्यवस्थेतील महत्त्वाची कामे आहेत. मात्र, यंदा नहरांची आवश्यक साफसफाई आणि गाळ उपसा वेळेत झाला नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होत असून, धरणातून सोडलेले पाणी अपेक्षित ठिकाणी पोहोचत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तक्रारींची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करणेआवश्यक आहे.