रेतीवरील कारवाईत ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. २४ आॅक्टोबर रोजी मोहाडी, पालांदूर आणि पवनी परिसरात करण्यात आलेल्या चार स्वतंत्र कारवायांमध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेतीसह एकूण ३० लाख १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शासनाच्या मालकीच्या रेतीची विनापरवाना वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्तीदरम्यान ही कारवाई केली. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

रोहा येथे वैनगंगा नदीपात्रातून रेती चोरीचा प्रयत्न मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहा येथील वैनगंगा नदीपात्रात २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल लक्ष्मणराव तुमाने हे पथकासह अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना नदीपात्रातून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साहाय्याने रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रोहा येथील वैनगंगा नदीपात्रात जाऊन तपासणी केली असता, स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली विनाक्रमांकाची निळी ट्रॉली आढळली. ट्रॉलीमध्ये रेती भरलेली होती.

रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती भरण्यासाठी वापरली जाणारी दोन घमेली व दोन फावडी असा एकूण ८ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ६२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मते करीत आहेत. पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकल शेतशिवारात वाकल ते पालांदूर मार्गावर २४ आॅक्टोबर रोजी पहाटे ५.३० ते सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान दुसरी कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात ट्रॅक्टरचालक कैलास अशोक केवट (वय ३६, रा. वाकल, ता. लाखनी, जि. भंडारा) आणि ट्रॅक्टरमालक रोहित किशोर भुसारी (वय २३, रा. पालांदूर, ता. लाखनी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. मालकाच्या सांगण्यावरून शासनाच्या मालकीच्या रेतीची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी लाल रंगाचा ट्रॅक्टर, त्याला जोडलेली विनाक्रमांकाची ट्रॉली आणि त्यातील अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ई) आणि ४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मासुरकर करीत आहेत. पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलघाटा वॉर्ड परिसरात २४ आॅक्टोबर रोजी पहाटे ५ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार श्रीकांत रावदास मस्के हे पथकासह गस्त घालत असताना बेलघाटा येथून खापरी गावाकडे जाणाºया मार्गावर विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याचे आढळले.

या कारवाईत अंदाजे एक ब्रास रेती, निळ्या रंगाचा विनाक्रमांकाचा सोनालिका डीआय-४२ आरएक्स ट्रॅक्टर आणि एमएच ३६/झेड ५७२१ क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मेश्राम करीत आहेत. पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच कुर्झा शिवारात कुर्झा ते वासेळा मार्गावर २४ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.१५ ते ११.३० वाजताच्या दरम्यान आणखी एक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ट्रॅक्टरचालक रूपेश रतिराम मानकर (वय ३२) आणि मालक विशाल रामू कुलूरकर (वय २६), दोघेही रा. कुर्झा, ता. पवनी, जि. भंडारा, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी संगनमताने विनापरवाना रेतीची वाहतूक केल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या कारवाईत निळ्यापांढºया रंगाचा विनाक्रमांकाचा स्वराज८४३ एफई ट्रॅक्टर, त्याला जोडलेली विनाक्रमांकाची निळी ट्रॉली आणि अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पवनी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *