भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरातील ६० वर्ष जुनी नगर परिषद इमारत आता धोकादायक झाली आहे. पहिल्याच पावसात इमारतीचा काही भाग कोसळल्याने इमारतीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. यामुळे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी तातडीने सर्व विभाग इंदिरा गांधी स्टेडियम येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या पावसानंतर नगर परिषद इमारतीतील उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूमेश्वरी झलके यांच्या दालनातील खिडकीजवळील प्लास्टरचा भाग अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अधिकारीकर्मचाºयांनी तातडीने ही बाब मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्याधिकारी बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली. ६० वर्ष जुनी झालेली इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून कोणत्याही क्षणी मोठा भाग कोसळू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. नागरिकांच्या आणि कर्मचाºयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी सर्व विभाग तात्काळ इंदिरा गांधी स्टेडियम येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, ही इमारत तोडून नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडून २ वर्षांपूर्वीच २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र निधी मंजूर होऊनही दोन वर्षे उलटूनही नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झालेले नाही. जुनी इमारतच वापरात असल्याने आजचा अपघात घडला. आता जुनी इमारत बंद करून सर्व व्यवहार तात्पुरत्या स्वरूपात इंदिरा गांधी स्टेडियममधून चालणार आहेत. मात्र २ कोटी रुपये येऊनही नवीन प्रशासकीय इमारत कधी बांधणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळ्यात आणखी अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने नवीन इमारतीच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.