गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील तकिया वार्ड येथून हनुमान नगरकडे जाणारा मुख्य मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्याचे चिखलमय रूप समोर आले असून वाहनचालक व पादचारी यांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित प्रशासन आणि नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजीव गांधी चौकातून हनुमानागर, अंबिका नगर आणि तकिया वार्ड परिसराकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग दररोज शेकडो नागरिक वापरतात. मात्र या रस्त्याचे कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिट किंवा डांबरीकरण न करता दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात खडी, मुरूम आणि सिमेंट मिश्रित साहित्य टाकून रस्ता तयार केला जातो. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील तीन वर्षांपासून या रस्त्याच्या पक्क्या बांधकामाचेआश्वासन दिले जात आहे. शासना कडून मंजुरी मिळाल्याची चर्चा असतानाही प्रत्यक्षात काम होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अवघ्या आठ दिवसांपूर्वी गटर व पाईपलाईनचे काम करण्यात आले. त्यामुळे रस्ता अधिकच खराब झाला असून सर्वत्र चिखल, खड्डे आणि पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची भीती वाढली आहे. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांनाही यामार्गावरून जाणे कठीण झाले आहे.
अनेक ठिकाणी रस्त्याची स्थिती इतकी खराब झाली आहे की वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शासनाकडून मंजूर असलेला हा रस्ता अद्याप पक्का का करण्यात आलेला नाही? दरवर्षी तात्पुरती कामे करून निधी खर्च केला जातो, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? तसेच या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाºयांवर कारवाई होणार का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. हनुमान नगर, अंबिका नगर आणि तकिया वार्ड परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागार्चे तातडीने सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरत आहे. “पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.