ग्रामपंचायतीचा कारभार नेमका चालतो तरी कसा?
कचरा गाडी झाली शोभेची वस्तू; ‘कर्मचारीच मिळत नाही’ म्हणत प्रशासनाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
स्वच्छतेच्या कामासाठीच कर्मचारी मिळत नसतील, तर ग्रामपंचायत चालवायची तरी कशी? नागरिकांचा संताप सवाल
भंडारा पत्रिका/वार्ताहर
दिघोरी मोठी : गाव स्वच्छ ठेवण्याच्या गप्पा मारणाऱ्या दिघोरी मोठी ग्रामपंचायतीच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावातील कचरा संकलनासाठी असलेली कचरा गाडी गेल्या तब्बल दोन महिन्यांपासून गावात फिरकत नसल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी असलेली गाडी आता केवळ शोभेची वस्तू बनून राहिली आहे की काय?, असा संताप सवाल स्थानिक नागरिकांडून उपस्थित केला जात आहे.
गावातील कचरा नियमितपणे उचलणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, दिघोरी मोठी येथे दोन-दोन महिने कचरा गाडी गावात फिरत नसेल, तर ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेचे नेमके चालले तरी काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
‘कर्मचारी मिळत नाही’ हा कसला बहाणा
कचरा गाडी नियमित का फिरत नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, स्थानिक जनप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगण्यात आले असल्याचे चर्चा आहे. मात्र, स्वच्छतेच्या कामासाठीच कर्मचारी मिळत नसतील, तर ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होणार नाहीत का?
कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करणे, पर्यायी व्यवस्था उभी करणे आणि गावातील स्वच्छता सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? कर्मचारी नसल्याचे कारण देऊन दोन महिने कचरा गाडी बंद राहणार असेल, तर दिघोरी मोठी येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी কোणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायत केवळ मंचावर आणि कार्यक्रमापुरتيच?
गावाच्या विकासासाठी बैठका, कार्यक्रम आणि व्यासपीठांवरून आश्वासने देणे सोपे असते. मात्र, प्रत्यक्षात गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी किती तत्परता दाखवली जाते, याची खरी परीक्षा दैनंदिन कामकाजातून होते.
दिघोरी मोठी गावातील कचरा उचलण्यासारखी मूलभूत व्यवस्था दोन महिन्यांपासून विस्कळीत असेल, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कोण चालवत आहे? जनप्रतिनिधी केवळ मंचावर आणि कार्यक्रमापुरतेच मर्यादित आहेत का? किंवा नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे लक्ष देण्यासाठीही ग्रामपंचायतीकडे वेळ नाही, असे बोचरे प्रश्न स्थानिकर नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांना आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी
गावातील स्वच्छतेचा प्रश्न हा केवळ कचरा उचलण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि परिसराच्या स्वच्छेशी संबंधित आहे. त्यामुळे दिघोरी मोठी येथील कचरा गाडी बंद राहण्यामागील नेमके कारण काय, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात अडचणी कोणत्या आणि कचरा संकलन पुन्हा नियमित करण्यासाठी ग्रामपंचायतीने काय नियोजन केले आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा गाडी तातडीने सुरू करावी आणि नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एकच – दिघोरी मोठी गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणार कोण आणि दोन महिन्यांपासून बंद असलेल्या कचरा गाडीचा प्रश्न मार्गी लावणार कधी.