साकोलीत विद्यार्थी न्याय मोर्चा,शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नीट पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांवरील अन्याय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्यावरील कथित कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२०) साकोली येथे विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था, पुरोगामी विचारांचे नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विद्यार्थी न्याय मोर्चा काढण्यात आला. बुद्ध विहार येथून निघालेल्या मोर्चाने शहरात भ्रमण करत तहसील कार्यालय गाठले. यावेळी केंद्र सरकारच्या कथित शिक्षणविरोधी धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून एस डी. एम. स्वाती देसाई यांच्यामार्फत राष्ट्रपती व केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

साकोली तालुका स्मारक समिती व विविध विद्यार्थी संघटनांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पुरोगामी विचारसरणीचे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “नीट पेपर रद्द करा”, “शिक्षणात पारदर्शकता हवी”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “शिक्षणातील भ्रष्टाचार थांबवा”, “विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा” आणि “हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे” अशा घोषणांनी साकोली शहर दणाणून गेले. मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता तालुका बुद्ध विहार, एकोडी रोड येथून करण्यात आली. प्रगती कॉलनी मार्गे शहरातील प्रमुख भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे आयोजित सभेत वक्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर विविध सार्वजनिक प्रश्नांसह विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना आंदोलनापासून रोखण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंभुर्णे यांनी, “देशातील विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणे ही काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.

नगरसेवक इंजी. कुणाल राऊत, गटनेते नगरसेवक संदीप बावनकुळे ,नगरसेविका निर्मला नंदेश्वर, नगरसेवक विवेक बैरागी, सामाजिक कार्यकर्ते भावेश कोटांगले, बिट्टू गजभिये, अतुल डोंगरे , दिलीप मासुरकर यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील प्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांचे सदस्य, पालक आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयोजकांनी हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आल्याची माहिती दिली.सभेनंतर एसडीएम स्वाती देसाई यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, विद्यार्थ्यांच्या हिताचे धोरण राबवावे तसेच सोनम वांगचुक यांच्यावरील कथित कारवाईबाबत केंद्र शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *