भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गौमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे आणि गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी वेगळे मंत्रालय स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी आज गोंदिया शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या सर्व संघटनांनी एकाच सुरात गौमातेला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी केली. गाय ही केवळ पशु नसून भारतीय संस्कृती, शेती आणि आरोग्याचा आधार आहे. त्यामुळे तिला “राष्ट्रमाता” चा दर्जा देऊन तिचे रक्षण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच गायींच्या संगोपन, गोशाळा अनुदान आणि गोवंश हत्या बंदीसाठी केंद्र व राज्य सरकार स्तरावर स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुका आणि गावांमधून आलेल्या नागरिकांनी सहभाग घेतला.
जिल्हाभरातून गोप्रेमी नागरिकांच्या ६९ हजार स्वाक्षºया असलेले पत्र यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या नावाने असलेले निवेदनही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात आले. या निवेदनात गौहत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि गोपालकांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक सामाजिक, धार्मिक आणि गोसेवा करणाºया संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. हात भगवे झेंडे, गौमातेचे फोटो आणि “गौमाता राष्ट्रमाता हो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आयोजकांनी सांगितले की, जर सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तर या मोर्च्यात गोविंद जी येडे, हंसराम रोकड़े, रामकृष्ण बावनकर जी,कूवरलाल जी भगत, जोगा सर, ठाकरे सर, स्वदेश ठाकुर, गौरव वानखेडे, छत्रपाल पटले, सुनिल गजभिये, गजानन राय, कोमलप्रसाद जी गौतम, डॉ. प्रशांत कटरे, शंकर लाल जी अग्रवाल, सूरज नसीने, महेश पांडे, जय चौरसिया, भगत जी, विक्की गोहरे, विवेक बैस, देवेश मिश्रा, हरीश अग्रवाल, अंकित कुलकर्णी, पंकज चौधरी, राजीव ठाकरेले, दीप्ति मिश्रा, सुनील तिवारी, अजीत सिंग, रमेश अग्रवाल आदी सहभागी झाले.