उन्हाळय़ाआधीच उष्णतेची लाट?

 नागपूर / पुणे : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच तापमानाचे विक्रम मागे पडू लागले असून उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. येत्या तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ संभवते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत कमाल तापमान वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागांमध्येच कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. जळगाव सोडल्यास इतरत्र किमान तापमानही वाढत आहे. त्यामुळे राज्यभर उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे चित्र आहे.

दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांचे तापमान आधीचे विक्रम मोडीत काढीत आहे. उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. देशाच्या अनेक भागांत ही तापमानवाढ संभवते. उन्हाळय़ाची सुरुवात मार्चमध्ये होते, मात्र यंदा फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमान वाढण्याचा अंदाज आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ातच वायव्य भारतातील काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक चढू शकतो.

राज्यातील सर्वात कमी कमाल तापमान मुंबई (३२.६), डहाणू (३१.२) आणि महाबळेश्वर (३१.४) येथे नोंदवण्यात आले आहे. पुणे (३५.१), नाशिक (३५.१), सांगली (३५.६), सातारा (३५.४), सांताक्रूझ (३५.५), औरंगाबाद (३५.४), बुलढाणा आणि यवतमाळमध्ये (३५.५) तर नागपूरमध्ये (३५.२) एवढे कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या भागांमध्ये तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा पाराही ओलांडल्याचे शनिवारी दिसून आले आहे. पुणे (१२.५), जळगाव (९.७) आणि औरंगाबाद (१२.६) सोडल्यास इतर सर्व ठिकाणी किमान तापमानाने १५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. हिवाळय़ात या वर्षी बºयाच ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली होती. अनेक राज्यांमध्ये किमान तापमान एकांकावर आले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये गारठवणाºया थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. यंदाचा उन्हाळाही तीव्र असू शकतो, असा अंदाज आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *