महिला पोलिसावर गोळीबार करणाºया दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बिहारमधील एका महिला पोलिस शिपायाला एकतर्फी प्रेमातून गोळीबार करून ठार करणाºया दोन आरोपींना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. मो. हसन अर्शद (२७), मो. सज्जाद सुफी (२३, दोन्ही रा. कटीहार, बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई नागपूर रेल्वेस्थानकावर करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

बिहारच्या कटीहार जिल्ह्यात राहणारी २१वर्षीय महिला शिपाई आणि हसन यांच्यात मैत्री होती. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून युवतीने मैत्री तोडली. मात्र, हसन तिला त्रास देत होता. या वादातून त्याने सहा साथीदारांच्या मदतीने भटवारा येथे या महिला शिपायावर गोळीबार केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कोडा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मात्र, हसन आणि सज्जाद पळून जाण्यात यशस्वी झाले. दोघेही १२६५० कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एस-४ कोचमधून दिल्ली ते बेंगळुरू प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना मिळाली. त्यांनी नागपूर लोहमार्गपोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांच्या मोबाइलवर दोघांचेही छायाचित्र पाठविले. काशीद यांनी लगेच पथकातील सदस्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर छायाचित्रासह माहिती पाठविली. लोहमार्ग पोलिसांचे पथक संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत होते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास गाडी नागपूर स्थानकावर पोहोचली.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक तायवाडे, वघारे, सतीश बुरडे, बबन धोगंडी यांच्यासह आरपीएफ जवानांनी गाडीचा ताबा घेतला. प्रत्येक डब्याची झडती घेत असताना एस-४ कोचमधील १ आणि २ नंबरच्या बर्थवर असलेल्या संशयित युवकांची चौकशी केली. छायाचित्र तपासले असता त्याच्यात समानता वाटल्याने दोघांनाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. चौकशीअंती महिला पोलिस शिपायाची हत्या करून पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले. काशीद यांनी लगेच ही माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, पोलिस उपनिरीक्षक रूपक रंजन सिंग दोघेही विमानाने नागपुरात पोहोचले. काशीद यांनी न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *