डोजरखाली येऊन कामगाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी राजुरा : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांंतर्गत येणा-या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत मातीच्या ढिगा-यावरील चेन डोजरच्या खाली येऊन पर्यवेक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. नागराजु पोनगंटी (३२ रा. तेलंगाना) असे मृतकाचे नाव आहे. बुधवारी ही घटना उघडकीस येताच संतप्त कामगारांनी कोळसा खाणीचे काम पाच तास बंद पाडले. नागराजु पोनगंटी हा मंगळवारी रात्रीच्या सुमारास धोपटाळा खुल्याकोळसा खाणीत काम करीत होता. यावेळी मातीच्या ढिगाºयावरील चेन डोजरच्या खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

मात्र, या घटनेची माहिती कुणालाही न देता मृतकाचे पार्थिव घटनास्थळावरून परस्पर हलविण्यात आले. बुधवारी सकाळी इतर कामगारापर्यंत ही माहिती पोहचताच कामगारांनी जवळपास ५ तास कोळसा खदान बंद पाडली. इंटकचे नेते तथा ओबीसी वेल्फेयर असोसिएशन बल्हारपूर क्षेत्राचे समन्वयक आर. आर. यादव, क्षेत्रीय अध्यक्ष रवी डाहुले, एम. के. सेलोटे, महादेव तपासे, आयटक नेते दिलीप कनकुलवार, भारतीय कोयला खदान मजदुर संघाचे नेते पांडुरंग नंदुरकर आदींनी आंदोलनकर्ते व ग्रामीण लोकांमध्ये मध्यस्थी करीत नियमानुसार आर्थिक मोबदला व लेखी मागण्या मान्य केल्यावर तणाव निवळला.

त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करूनकोळसा खदान पूर्ववत सुरु करण्यात आली. घटनास्थळी पुरेसा प्रकाश व्यवस्था नसल्याने हा अपघाती मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डोजर चालक रवींद्र कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.