
भाजपाच्या देवश्री कापगते यांचा 2230 मतांनी विजय
काँग्रेसला स्थानिक निष्क्रिय नेतृत्वाचा फटका
दिग्गजांना नकार; तरुण चेहऱ्यांच्या हातात सत्ता
नव्या चेहऱ्यांना जनतेची पसंती
साकोली – नगरपरिषदेच्या निवडणुकीत या क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या राजकीय वर्चस्वाला जोरदार धक्का बसला असून भाजपाच्या देवश्री मनीष कापगते यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत 2230 मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले आहे. काँग्रेसच्या सुनीता अशोक कापगते व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या भारती मोहन लंजे यांच्या तिरंगी लढतीत काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकीत जनतेने जुने चेहरे नाकारत नव्या, तरुण नेतृत्वावर विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतमोजणी व विजयाचा तपशील
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपाच्या देवश्री मनीष कापगते यांनी आघाडी घेतली होती. अंतिम निकालात देवश्री कापगते यांना 6677 मते, काँग्रेसच्या सुनीता अशोक कापगते यांना 4447 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) च्या भारती मोहन लंजे यांना 3508 मते मिळाली. प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवत देवश्री कापगते यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 2230 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे सेदुंरवाफा येथील रहिवासी असूनही सुनीता कापगते यांना त्यांच्या परिसरातून अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत, तर साकोली येथील रहिवासी असलेल्या देवश्री कापगते यांना शहरवासीयांनी स्पष्ट प्राधान्य दिले.
राजकीय गणित आणि काँग्रेसला बसलेला फटका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार भारती मोहन लंजे यांच्या प्रभावी एन्ट्रीमुळे काँग्रेसची मते विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाला. शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या निष्क्रिय, असंघटित नेतृत्वाचा फटका या निवडणुकीत उघडपणे दिसून आला. काँग्रेसमध्ये तेच ते जुने चेहरे पुढारी म्हणून वावरत राहिल्याने आणि नव्या युवकांना संधी न दिल्याने जनतेने जुन्या नेतृत्वाला नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आमदार नाना पटोले यांच्यासमोर आता संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नगरसेवकांचे संख्याबळ व राजकीय चित्र
नगरपरिषदेच्या १० प्रभागांतून २० नगरसेवक निवडून आले असून त्यात भाजपाचे 8, काँग्रेसचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, शिवसेनेचा 1, तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच नगराध्यक्ष देवश्री कापगते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली, तर नवनिर्वाचित नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागांत विजय उत्सव साजरा केला.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक 1 : पुष्कर करंजेकर (शिवसेना), वैशाली लांजेवार (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 2 : राजकुमार पोगडे (भाजपा), त्रिवेणी चौधरी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 3 : कुणाल राऊत (काँग्रेस), रोहिणी मुंगुलमारे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 4 : पंकज मुंगुलमारे (भाजपा), प्रीती डोंगरवार (भाजपा)
प्रभाग क्रमांक 5 : संदीप बावनकुळे (काँग्रेस), मेघा बडवाईक (भाजपा)
प्रभाग क्रमांक 6 : प्रमोद गजभिये (भाजपा), सायली दोनोडे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 7 : किशोर पोगडे (भाजपा), सौ. रेणू गणवीर (भाजपा)
प्रभाग क्रमांक 8 : नयन पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस – अप), निर्मला नंदेश्वर (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 9 : सोनू बैरागी (अपक्ष), मिनाबाई लांजेवार (भाजपा)
प्रभाग क्रमांक 10 : सपनभाऊ शरद कापगते (अपक्ष), स्मिता सिडाम (काँग्रेस)
चुरशीच्या लढती, दिग्गजांचा पराभव आणि नव्यांचा उदय
या निवडणुकीत अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँग्रेसच्या निर्मला नंदेश्वर यांनी भाजपाच्या गीता बडोले यांचा फक्त एका मताने पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाच्या किशोर पोगडे यांनी काँग्रेसचे अश्विन नशीने यांचा 7 मतांनी पराभव केला. भाजपाचे रवी परशुरामकर, महादेव कापगते, गीता बडोले, काँग्रेसचे अश्विन नशीने, हेमंत भारद्वाज, विलास मासुरकर, तसेच राष्ट्रवादीचे सुरेश बघेल, यांसारख्या अनुभवी दिग्गजांना जनतेने नाकारले. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उभे राहिलेले सोनू बैरागी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना विजयी झाले, हे जनतेच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतीक ठरले आहे. शहराच्या विकासासाठी नव्या, तरुण चेहऱ्यांना संधी देत साकोलीकरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.