
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यसह इतरही मागण्यांसाठी आज दि.२७ फेब्रु. रोजी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात काँग्रेसचे खा. प्रशांत पडोळे सहभागी झाले होते. शेकडो शेतकºयांनी या मोर्चात सहभागी होत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भारतीय किसान संघाच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारांना निर्वळदन देऊन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केल्या जाणाºया धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी केली होती. विशिष्ट मुदतीत या संदर्भात निर्णय न झाल्यास मोर्चा काढण्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान आज २७ फेब्रुवारी रोजी भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक येथून शेतकºयांचा मोर्चा काढण्यात आला. गांधी चौक, पोस्ट आॅफिस चौक या मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, महामंत्री दिनेश कापगते यांच्यासह भंडाºयाचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आधारभूत धान खरेदी केंद्र संस्था चालक संघाचे अध्यक्ष नेपाल रंगारी यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून विविध मागण्या रेटून धरल्या. अनेक शेतकरी आज अडचणीत आले आहेत. शेतकºयांच्या धानाची विक्री थांबली आहे. ४० टक्के शेतकरी अजूनही ध्यान विकला जाईल या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम २०२५-२६ चे धान खरेदीचे उद्दिष्ट अपुरे पडले आहे. हे उद्दिष्ट वाढवून दिल्याशिवाय उर्वरित शेतकºयांच्या धान्याची खरेदी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जाऊ शकत नाही. जवळपास ४० टक्के शेतकरी आज वाढीव उद्दिष्टाच्या प्रतीक्षेत आहेत. हे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला जावा आणि अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.