भंडारा शहरात खळबळ : तरुणाची निर्घृण हत्या

भंडारा पत्रिका:भंडारा : शहरातील जालाराम चौक परिसरात शुक्रवारी रात्री 11 ते 11.30 वाजताच्या दरम्यान एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. कार्तिक भंडारी (वय अंदाजे 26 वर्षे, रा. संताजी वार्ड, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक भंडारी हा जालाराम चौक परिसरातच रुईच्या दुकानात बेड व गाद्या तयार करण्याचे काम करीत होता. शुक्रवारी रात्री अज्ञात आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वीही कार्तिकवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या हत्येचा पूर्वीच्या घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली असून पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. भंडारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *