१५ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याने शेतकरी चिंतेत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तीव्र उन्हाळ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यातही पावसाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मृग नक्षत्राची सुरुवातही कोरडीच झाली आहे. पावसाच्या आगमनाशी जोडले जाणारे मृग नक्षत्र यंदा ८ जूनपासून सुरू झाले असून २२ जूनपर्यंत राहणार आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून शेतकºयांची चिंता वाढली आहे. दरवर्षी साधारणत: ७ जून रोजी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. यंदा खगोलीय गणनेनुसार हा प्रवेश ८ जून रोजी झाला. पंचांगकर्त्यांनी यंदाच्या मृग नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने १५ जूनपर्यंत विशेष पावसाची शक्यता नसल्याचे संकेत दिल्याने मृग नक्षत्र कोरडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात मृग नक्षत्राचा काळ खरीप हंगामाच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच काळात शेतकरी पेरणीची तयारी पूर्ण करून पावसाच्या प्रतीक्षेत असतात. सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर यांसारखी खरीप पिके नक्षत्रांच्या कालावधीत होणाºया पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. कृषी परंपरेनुसार मृग नक्षत्रात पावसाची खरी सुरुवात अपेक्षित असते. त्यानंतर आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी आणि हस्त या नक्षत्रांमधील पाऊस पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १२२०.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र ९ जूनपर्यंत केवळ १.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना किमान ७० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामावर ‘अल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने त्या अंदाजाची प्रचिती येऊ लागली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *