
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :उमेद अभियानांतर्गत काम करणाºया सौ. अलका तुकाराम बावनकर यांच्यावर अन्याय झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २०१६ पासून प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांना तब्बल ११ महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. सध्या सहा हजार रुपये मासिक मानधन असतानाही त्यातून विविध कारणांनी कपात केली जाते, तसेच मोबाईल रिचार्ज, बैठकांचा खर्च आणि इतर आर्थिक भार स्वत:लाच सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पगाराची मागणी केल्यास ‘जे जमेल ते कर’ अशी उद्धट प्रतिक्रिया पदाधिकाºयांकडून मिळाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. अजून गंभीर बाब म्हणजे, क्लस्टर सीसी परविंद्रा गरिबा पवार मॅडम यांनी वैयक्तिक द्वेषातून पदाचा गैरवापर करत त्यांना आयसीआरपी पदावरून काढून टाकल्याचा आरोप आहे.
प्रशिक्षणादरम्यान मिळणाºया भोजनाच्या मोबदल्यातून जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले असून, यासंदर्भातील फोनपे व्यवहारांचे स्क्रीनशॉट त्यांच्या जवळ असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तिक आयुष्यातील दु:खद प्रसंगात, मुलाच्या गंभीर आजारपणानंतर मृत्यू झाला असतानाही त्यांच्यावर पैशांची मागणी आणि दबाव टाकण्यात आला. पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. यानंतर प्रभाग संघाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवत कामावरून कमी केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे केवळ त्यांच्यावरच नव्हे तर इतर महिलांवरही अशाच प्रकारे अन्याय होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सौ. बावनकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच थकीत ११ महिन्यांचा पगार तात्काळ देऊन पुन्हा सेवेत रुजू करण्याची विनंती केली आहे.दरम्यान, आंदोलनाच्या काळात आपल्या जीवितास काही अपाय झाल्यास संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.