
गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविले जात असताना दुसरीकडे भंडारा शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील मोठ्या नाल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पुडे, थर्माकोल, वैद्यकीय कचºयासदृश साहित्य आणि इतर घनकचरा साचल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे हा नाला शहरातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सामान्य रुग्णालयासमोर असल्याने येथे दररोज शेकडो रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र नाल्यात साचलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिक तसेच रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण नाल्यात साचलेले सांडपाणी आणि कचरा यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो. विशेषत: रुग्णालय परिसरात अशा प्रकारची अस्वच्छता चिंतेचा विषय बनली आहे. पावसाळ्यात पूरस्थितीची शक्यता नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. आगामी पावसाळ्यात जोर- दार पाऊस झाल्यास पाणी तुंबून रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालय परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची ये-जा प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष? स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक दिवसांपासून या नाल्याची योग्य प्रकारे साफसफाई करण्यात आलेली नाही.
स्वच्छतेबाबत संबंधित विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीच अशी अवस्था असेल तर इतर भागातील परिस्थिती काय असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तातडीने कारवाईची मागणी सामान्य रुग्णालयासमोरील नाल्यातील कचरा त्वरित हटवून संपूर्ण नाल्याची स्वच्छता करावी, नियमित साफसफाईचे नियोजन करावे तसेच नाल्यात कचरा टाकणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. “रुग्णालय परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून सामान्य रुग्णालयासमोरील नाल्याची तातडीने सफाई करावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.