भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : मंगळवारी रात्री गांधी चौकात पानटपरी बंद करीत असलेल्या युवकावर लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी १२ तासांत अटक केली. साकोली तालुक्यातील मोहघाटा-खैरी शेतशिवारात शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे जवान डोक्यावर गवताच्या पेंढ्या आणि पाठीवर फवारणी पंप घेऊन शेतशिवारात पोहोचले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता गांधी चौक, भंडारा येथे फिर्यादी पानटपरी बंद करीत असताना नेहरू वॉर्ड, मेंढा येथील प्रणय उर्फ पन्नू सुनील बोरकर (१९) आणि विक्की प्रमोद मुरुरे (१९) तसेच दोन विधीसंघर्ष बालकांनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉडने डोक्यावर, तर तलवारीने पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने १२ तासांत दोन्ही आरोपींसह दोन विधीसंघर्ष बालकांचा शोध घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा आणि पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक आशिफ बोरकर, पोलीस उपनिरीक्षक रोशन ओकते, पोलीस हवालदार अंकुश पुराम, प्रशांत कुरंजेकर, अनुप वालदे, तसेच पोलीस सिपाई रोहन काळे आणि रोहित आंबेडे यांचा समावेश होता.