शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागात एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आरसेटी गोंदियाव्दारे ग्राम संघ कार्यालय निमगाव तालुका तिरोडा येथे १२ सप्टेंबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दहा दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये एकूण ३५ प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. प्रशिक्षणामध्ये उदय खर्डेनवीस -एलडीएम यांनी किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज व विमा, मुद्रा योजना व जनसमर्थ पोर्टल बद्दल माहिती दिली. आरसेटी निदेशक राहुल गणवीर यांनी ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे स्थपित आरसेटी स्थापन करण्यामागे काय उद्देश्य आहे याबद्दल विस्तृत माहिती व प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार करून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो याबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणार्थ्यांना शेळीपालन व्यवसायाच्या विविध पद्धती मोकाट, बंदिस्त, अर्धबंदिस्त पद्धत, गोठ्यासाठी जागेची निवड, चारा व खाद्य व्यवस्थापन, चारा लागवडीचे हैड्रोफोनी तंत्रज्ञान, शेळ्यांचे आजार व लसीकरण, शेळीपालन व्यवसायाकरिता बाजार व्यवस्थान अश्या विविध विषयावर कौशल्य प्रशिक्षक हेमंतकुमार बघेले यांच्याद्वारे मार्गदर्शन केले. त्यासोबतच उत्तम उद्योजक बनण्याकरिता उद्योजकीय सक्षमता, उद्योजकीय क्षमता विकास, व्यवहार, वेळ व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन व प्रकल्प अहवाल अश्या विविध विषयावर अश्विनी टेम्भूर्णीकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणार्थ्यांची दहाव्या दिवशी शादाब गोट फार्म येथे क्षेत्रभेट घडविण्यात आली त्यासोबतच ग्रामीण विकास मंत्रालय तर्फे लेखनलाल बोपचे व दामोदर धुवाधपारे यांच्या द्वारे प्रशिक्षणार्थ्यांची लिखित व मौखिक परीक्षा घेऊन एकूण ३४ प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश झाडे, विवेक वाहने व रजनी टेम्भूर्णीकर यांचे सहकार्य मिळाले. संस्थेने दिनांक ३ आॅक्टोबर २०२२ ते १२ आॅक्टोबर २०२२ या कालावधीत निवासीमोफत “फास्ट फूड स्टॉल उद्यमी” हे प्रशिक्षण कोर्स लावण्याचे निश्चित केलेले असून इच्छुक लाभार्थ्यांनी आधार कार्ड, वर्ग १० ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, बीपीएल असल्याबाबद रॅशन कार्ड/रोजगार हमी जॉब कार्ड/ग्राम पंचायत प्रमाणपत्र/आयुष्यमान भारत कार्ड/पीएमआवास योजना लाभार्थी पुरावा यापैकी कोणत्याही एका कागदपत्रासोबत बँक आॅफ इंडिया स्टार गोंदिया आरसेटी, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोल पंप, तिरोडा रोड, कुडवा, गोंदिया-४४१६१४, संपर्क क्रमांक ०७१८२२५२००७ वर संपर्क साधावा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.