प्राचीन संस्कृती जपणारे म्हसेपठार गाव

तालुका वार्ताहर कळमेश्वर : गेल्या पन्नास वर्षात माणसाचे यंत्र झाले आहे. भराभर सगळे जुने टाकून द्यावयास लागल्यामुळे संस्कृती लोप पावत चालली आहे. पाश्चात्य संस्कृती युवामनावर अधिराज्य गाजवत आहे. अश्लील विकृती व दिशाहीन दर्शनाने युवा पिढी भरकटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तंत्रज्ञान व ज्ञानाचा विस्फोट होत असताना आपली संस्कृती कुठेतरी हरवत असल्याची शल्य अत्यंत वेदनादायी आहे. अशीही विपरीत परिस्थितीत कळमेश्वर तालुक्यातील म्हसेपठारात दंडारीची प्राचीन परंपरा जोपासली जात आहे. कळमेश्वर तालुक्यातील मोहपा जवळील म्हसेपठार येथे दिवाळीनिमित्त श्री कृष्ण लिला मंडळाच्या वतीने दोन दिवसीय विदर्भाची लोककला असलेली दंढारीचा कार्यक्रम अभिनव रंगमचावर नुकताच पार पडला. येथे गेल्या एकसष्ट वर्षापासून दिवाळीच्या दिवसांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते, हे विशेष.

यावर्षी पहिल्या दिवशी मंगळवारला किर्तनकार डॉ. सचिन काळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम तर दुसºया दिवशी बुधवारी सुभान पार्टी व राष्ट्रीय आझाद तिरंगा निशाण यांचा राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा व त्यानंतर दंढारीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासूनम्हसेपठारचे नागरिक विदर्भाची ही लोककला जोपासत आहे. आपली लोककला लोप पावत असताना ती पिढ्यांपिढ्या समोर चालावी, दिवाळीच्या दिवसांत पाहुने मंडळी गावात आल्याने त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी दंढारीमध्ये कलाकार म्हणून शंकरराव श्रीखंडे, हरीचंद लांडेकर, नरहरी बिडकर, रामचंद्र बेलखेडे, संजय कुबडे, राहुल श्रीखंडे, प्रमोद गुळांदे, अरविंद भोयर, अमित श्रीखंडे, स्वप्निल कावडकर, विकास माहुरे, हर्षल कावडकर, भुपेश कावडकर, नीरज बिडकर, प्रितम कावडकर, महेश कावडकर, कुणाल गुळांदे, मानव अंबडकर, हर्षल कावडकर, धनराज गुळांदे यांनी तर शशीकांत श्रीखंडे, चंद्रशेखर कावडकर, अनंता कावडकर यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.

काय असते ‘दंडार’

दंडार हे विदर्भाचे प्राचीन लोकनाट्य आहे. ते मुळात ‘कृषिनृत्य’ होते. ‘दंड’ म्हणजे शेत आणि ‘डार’ म्हणजे डहाळी, शेतात पडलेली उत्पन्नाची-धान्याची रास पाहून आनंदी झालेला शेतकरी आंब्याच्या पाच-सहा डहाळ्या तोडतो आणि आपल्या गडीमित्रांसोबत नाचायला लागतो, ही दंडारची मूळ संकल्पना. नंतर, काळानुरूप तिच्यात बदल होत गेले, हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *