पोटच्या गोळ्यांना पाहून कैदी गहिवरले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : एका विशिष्ट चौकटीचे वातावरण असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बालक दिनाच्या दिवशी वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. लहान मुलांच्या डोळ्यातील अगोदरची अनामिक भीती, वडिलांना अडीच वर्षांनी पाहून चेहºयावर आलेले भांबावलेले भाव, आवेगाने त्यांच्याशी घेतलेली गळाभेट आणि एरवी कोडगे अशी ओळख असलेल्या कैद्यांच्या डोळ्यात साचलेले अश्रू, असे दृश्य पाहायला मिळाले. बालक दिनानिमित्त कारागृहात आयोजित ‘गळाभेट‘ उपक्रमाअंतर्गत १०३ मुलांनी शिक्षा भोगत असलेल्या त्यांच्या वडिलांची भेट घेतली. ७२ कैद्यांना त्यांच्या मुलांना जवळ घेण्याची संधी मिळाली. अर्धा तासाचा वेळ देण्यात आला होता. अनेक कैद्यांनी कारागृहातील गिμट हाऊसमधून बिस्किटे, चॉकलेट, सोनपापडी, चिवडा, चिप्स आदी वस्तू खरेदी करून मुलांना दिल्या. त्याचबरोबर मुलांसाठी भाजीपुरी आणि फळांचीही व्यवस्था कारागृह प्रशासनाने केली होती. मुलांची, घरच्यांची ख्यालीखुशाली विचारून झाल्यावर कैद्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबतदेखील जाणून घेतले. कुणी त्यांच्या वडिलांसाठी हाताने तयार केलेले ग्रिटिंग आणले होते, तर कुणी भावनिक कविता वाचून दाखविली. मात्र, ही तीस मिनिटे कशी गेली, हे कोणालाच कळले नाही. अर्ध्या तासाचा कालावधी संपताच पालक आणि मुलांनी ओल्या डोळ्यांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याचे वचन दिले. यावेळी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, दीपा आगे, कारागृह अधिकारी आनंद पानसरे, वामन निमजे, नरेंद्र अहिरे, दीपक भोसले, भगवान मंचरे, माया धुतुरे, संजीव हातवडे प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *