गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार : सुधीर मुनगंटीवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित आणि नगर परिषदेकडून बांधण्यात येणाºया अद्ययावत नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या १५ आॅगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर काम करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी आमदार गोपालदास अग्रवाल, गोंदिया नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार चव्हाण, सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. झाडीपट्टी आणि हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. गोंदिया येथे अद्ययावत आणि सुसज्ज नाट्यगृह व्हावे आणि ते कलावंतांना माफक दरात उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. या सभागृहासाठी सौर ऊर्जेचा अधिक वापर व्हावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नाट्यगृहाच्या बांधकामासाठी वाढीव अंदाजित खर्चाबाबत बैठकीत चर्चा झाली आणि २३.५३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्री मुनगंटीवार यांनी मान्यता देऊन ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित मान्यता प्रदान करण्याच्या सूचना संबंधित उपसचिवांना दिल्या. निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून नगर परिषदेने हे काम तातडीने करुन घ्यावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. या सोबतच या सभागृहाच्या इमारतीत असलेल्या ३४ गाळ्यांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.