पुस्तकं माणसाला घडविण्याचे काम करतात – शर्मा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ग्रंथालय हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन मडके तयार करतात, त्याचप्रमाणे थोर-महापुरुषांचे ग्रंथ व विविध प्रकारच्या वाचन साहित्याची पुस्तके माणसाला घडविण्याचे काम करतात, असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी व्यक्त केले. श्री गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोंदिया येथे आयोजित दोन दिवसीय गोंदिया ग्रंथोत्सव-२०२२ च्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गोंदिया द्वारे (ता.२३) आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव२०२२ च्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रशेखर आंबोळे, समाजसेविका प्रा.डॉ. सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी.डी. रहांगडाले, सहसचिव वाय.डी. चौरागडे, अ‍ॅड. श्रावण ऊके, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे मंचावर उपस्थित होत्या. शासनाने ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य उपक्रम सुरु केला असून या माध्यमातून केवळ ग्रंथ विक्रीच नव्हे तर ग्रंथ संस्कृती वाढीला चालना मिळणार आहे. आई-वडिलांनी विद्यार्थ्यांना बालवयापासूनच वाचनाची सवय लावली पाहिजे.

विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून जीवनाला दिशा मिळते व ज्ञानात भर पडते. आज जरी इंटरनेटचे युग असले तरी पुस्तके वाचणाºयांची संख्या कमी झाली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून सुध्दा साहित्य वाचणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी ग्रंथ विकत घेऊन वाचण्याची सवय लावली पाहिजे. यावेळी त्यांनी कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकला व उपस्थितांची मने जिंकली. राज्यात जवळपास १२ हजार ५०० ग्रंथालये आहेत. गोंदिया जिल्ह्यात १९४ ग्रंथालये आहेत. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी यादृष्टीने दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाचन संस्कृती जोपासावी व वाचन चळवळ प्रगल्भ करावी हा या मागचा उद्देश आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून परिसंवाद व साहित्यातून ज्ञानात भर पडते. या निमित्ताने वेगवेगळे वाचन साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होत असतात.

वाचन संस्कृतीवाढविण्याकरीता व जोपासण्याकरीता सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे अस्मिता मंडपे यांनी यावेळी सांगितले. ग्रंथोत्सवाच्या दुसºया सत्रात ‘परिसंवाद’ आयोजित करण्यात आले. परिसंवादाचा विषय होता ‘सामाजिक प्रबोधन – एक अवलोकन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका प्रा.डॉ.सविता बेदरकर होत्या. या परिसंवादामध्ये मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी प्रा.डॉ.वर्षा गंगणे, जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता गोवर्धन बिसेन व कापसे कनिष्ठ महाविद्यालय तांडा प्रा.प्रकाश मेहर यांनी सहभाग घेतला होता. ग्रंथ हे गुरु असतात. ग्रंथ दिशादर्शक समाज घडविण्याचे काम करतात. ग्रंथ वाचनातून माणूस घडत असतो.

आज युवा पिढीला मोबाईलचा छंद लागलेला आहे. संध्याकाळी एकत्र येऊन चर्चा करणे व संवाद साधणे हे आजच्या काळात हरवलेले आहे. मोबाईलमुळे माणूस जवळ असून दूर असतो. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत:चा अनुभव व्यक्त केला. कोरोना काळात कविता लिहायला शिकलो असे गोवर्धन बिसेने यांनी सांगितले. प्रबोधन म्हणजे मार्गदर्शन करणे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक मिळून समाज बनतो. आज समाजामध्ये स्त्री ही असुरक्षीत आहे. स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. समाजाला शेतकºयांविषयी तळमळ असायला पाहिजे. प्रत्येकाने समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करावी. ग्रंथालय हे सामाजिक कार्य चळवळीचे एक प्रतिष्ठान आहे.

आजच्या नविन पिढीने ग्रंथ व विविध प्रकारच्या वाचन साहित्याची पुस्तके वाचावी, त्यामुळे ज्ञानात भर पडते वआपले विचार प्रगल्भ होत असतात. असे प्रा.डॉ. वर्षा गंगणे यांनी सांगितले. ग्रंथ हे समाजाला घडविण्याचे मार्ग आहे. मनामध्ये श्रध्दा असावी परंतू अंधश्रध्दा नसावी. सत्यपाल महाराज किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. मध्ययुगीन काळातील तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करावे.

मुले घडतात ते आईच्या संस्कारातून. जिजाऊ, सावित्री व रमाई यांनी आईची भूमिका योग्यरित्या पार पाडली. आई-वडिलांनी नविन पिढीतील विद्यार्थ्यांना सुसंस्कार देण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय या चारसुत्रीची आज देशाला गरज आहे. समाजाला आज प्रबोधनाचा गरज आहे, असे प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी सांगितले. यावेळी प्रा.डॉ. वर्षा गंगणे यांनी लिहिलेले वलय पुस्तक व गोवर्धन बिसेन यांनी लिहिलेले मयरी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी.डी.रहांगडाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहसचिव वाय.डी. चौरागडे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, वाचक वर्ग, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *