मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यात ‘सत्याग्रह’

भंडारा पत्रिका मुंबई : राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पदार्फाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या संविधान चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ.विकास ठाकरे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अतुल कोचेटा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी अदानीची चौकशी करण्याची मागणी करत असताना भाजप मात्र भ्ष्ट अदानीची बाजू घेत आहे. अदानीच्या भ्रष्टाचाराला भाजपाचा पाठिंबा आहे का? भाजपाच्या संरक्षणात अदानीने देशातील जनतेला लुटले आहे.

सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर अत्यंत जलतगतीने म्हणजे २४ तासाच्याआत खासदारकी रद्द करण्यात आली यामागे भाजपाचा हेतू काय होता हे स्पष्ट होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांच्या अत्याचाराचा सामना केला होता आणि याच सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र मिळवून दिले होते. नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही व्यवस्थेविरोधात काँग्रेस पक्ष देशभर सत्याग्रह करत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *