महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेवून देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भिमाबाई होते. त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले.
बाबासाहेब परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळविणारे पहिले भारतीय होते. बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुध्दीमान व सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे ते महापरिनिर्वाण झाले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, दलित, पीडीत, महिला, कामगार आणि वंचित घटकांना न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. आर्थिक धोरणाचे धुरीण, दलितांचे कैवारी, आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार, भाष्यकार, सांप्रदायिक सदभावना व सहिष्णूता प्रेरक, अंधश्रध्देचे विरोधक, महिलांना समान हक्कांसाठी संघर्षरत, प्रखर देशभक्त, झुंझार पत्रकार, संपादक व लेखक, शांतताप्रेमी व अहिंसेचे पुरस्कर्ते, प्रभावी वक्ते, सच्चे लोकशाहीवादी, कामगारांच्या न्याय अधिकारांचे लढवय्ये, प्रखर विज्ञाननिष्ठ, शिक्षणाचे प्रेरणास्तंभ, शेतकºयांच्या प्रश्नांसाठी जागरुक, ज्ञानपुरुष, समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी, विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते, ऊर्जा व जलसंसाधनाचे आद्यनियोजक, चिकित्सक संशोधक, राष्ट्रीय एकात्मतेसाठी द्रष्टानेता, देशाच्या संरक्षणासाठी सजग, मानवधिकाराचे खंदे पुरस्कर्ते, अद्वितीय संसदपटू व विधीतज्ञ होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु होते. पहिले श्रेष्ठ गुरु बुध्द, दुसरे गुरु कबीर व तिसरे गुरु ज्योतिबा फुले होते. तसेच त्यांचे तीन दैवत सुध्दा होते. ते म्हणजे विद्या, विनय आणि शिल. पहिले दैवत विद्या होय.
विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत देशातील विविध राज्य, प्रांत, भाषा, जात या सर्वांचा विचार करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील श्रेष्ठ राज्यघटना असून अनेकांसाठी ही आदर्श व प्रेरणादायी आहे. या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, ही आपल्या धमार्ची खरी शिकवण असली पाहिजे. भारतीय घटनेने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या विचारांचा स्वीकार अंगीकारुन सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करुन दिला. भारतीय राज्य घटनेमुळे आपली लोकशाही अधिक बळकट, सक्षम व सामर्थशाली झाली आहे. डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी आपली अमिट छाप उमटविली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.
डॉ.आंबेडकर केवळ पुस्तकी पंडीत नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्राच्या जीवनातील दु:ख, दारिद्रय, आणि तिरस्कार दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उध्दारासाठी कुशल कार्य करुन समतेची मंगलवाट दाखविली. डॉ.आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणासाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौध्दीकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शिल आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे असे ते सांगायचे. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी आहे. अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम… के. के. गजभिये उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *