शरद पवारांचा राजीनामा…. राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेरआत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

सदस्य समितीकडून ‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समिती निर्णय देणार आहे. समिती काय निर्णय देणार याकडे सा-या देशाचं लक्ष लागलं आहे.          अशातच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार आहे. प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसºया प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.

शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय अखेर मागे…

मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. २ मे रोजी शरद पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या निर्णयानंतर पक्षातून तीव्र विरोध झाला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दिग्गज नेत्यांनी त्यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. आज त्यांनी आपला निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, मी २ मे रोजी माज्या ‘लोक माझे सांगाती’ ह्या आत्मचरित्रपराच्या अनावरण समारंभावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. पण, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माज्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यानी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. माज्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही.

माज्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माज्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदा-या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील, असेही पवार म्हणाले.

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *