मोहाडीतील पाणीपुरवठ्यासाठी ३१ कोटी तर तुमसरच्या भुजाळी तलावाच्या पुर्ननिर्माणासाठी ६ कोटी मंजूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी नगर पंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची भीषण टंचाई सोडविण्याबाबत आणि तुमसर शहरातील भुजाळी तलावाचे पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्याच्या मागणीबाबत नागरिकांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना शासनाच्या योजनांतर्गत लाभ देण्याची विनंती केली होती. मोहाडी नगरपंचायत निवडणुकीवेळी येथील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन डॉ परिणय फुके यांनी दिले होते. तसेच तुमसर येथील भुजाळी तलावाच्या पुनर्निर्माण व सुशोभीकरणाच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिसरातील नागरिकांना आश्वासन देऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले होते.

डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून मोहाडी व तुमसर येथील योजनांच्या लाभासाठी निधीची मागणी केली होती. या संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत तुमसर शहरातील भुजाळी तलावाच्या पुनर्निर्माण व सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियान योजनेंतर्गत ६.१ कोटी रुपयांचा निधी ला मंजूरी प्रदान केली. तर मोहाडी येथील सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी “सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान” या नवीन प्रकल्पांतर्गत ३० कोटी २६ लाख २७२ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मोहाडी नगर पंचायत व तुमसर नगरपरिषद च्या या दोन्ही कामांना शासनाकडून मंजुरी मिळाल्याने परिसरातील कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी शिंदेफडणवीस सरकार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे आभार व्यक्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *