शिव विवाह, तांडव नृत्यने फेडले डोळ्यांचे पारणे

प्रतिनिधी भंडारा : थाटात पार पडलेला भगवान भोलेनाथाचा विवाह सोहळा, त्यापुर्वी निघालेली भगवंताची वरात आणि त्यात परमेश्वर नामात लीन होऊन नाचणारा भक्त अशा अत्यंत उत्साही आणि धार्मिक वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सांस्कृतिक सोहळ्याला सुरुवात झाली. याच सोहळ्यात अभिलाप्सा पांडा हिने हर..हर.. शंभू… गाण्याने वेगळीच वातावरण निर्मिती केली. श्रीराम शोभायात्रा समिती च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. २५ ते ३० मार्च या कालावधीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रायोजकत्वाखाली विविध वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम भंडारा येथील माधवनगर रेल्वे मैदानावर घेतले जात आहेत. २५ मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिव विवाह, शिव तांडव नृत्य, असे अनेक प्रसंग या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंतांकडून साकारल्या गेले.

शिव विवाह सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. परमेश्वराच्या निघालेल्या वरातीत आलेले प्रेक्षक बेधूंद होऊन नाचताना दिसले. शिव तांडव नृत्य एक वेगळा अनुभव देऊन गेले. सर्व सोहळ्यांमध्ये विशेष आकर्षण ठरले ते अभिलाप्सा पांडा यांचे हर..हर..शंभू… हे गीत. या गीतावर आबालवृध्द सर्वच ताल धरताना दिसले. एकापेक्षा एक सरस गाण्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर होते. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर, समितीचे संयोजक जॅकी रावालानी प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *