खेळण्यातील बॅटरीचा स्फोट ; बालकाचा गाल फाटला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बॅटरीवर चालणा-या चक्रीला पेपर गुंडाळून हवा घेत असताना बॅटरीचा स्फोट झाला आणि नऊ वर्षी बालक गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना सावनेर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (दि. २२) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालकावर नागपूर शहरात उपचार सुरू आहेत. चिराग प्रवीण पाटील (९, रा. रेल्वे क्वॉर्टर, रेल्वेस्थानक परिसर, सावनेर) असे जखमी बालकाचे नाव आहे. चिराग गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंसोबत खेळत होता. यात त्याने एका चक्रीला पेपरचे तुकडे लावले आणि जाड्या सेल (बॅटरी)चे कनेक्शन चक्रीला जोडून त्याची हवा घेत होता. ही चक्री त्याने त्याच्या चेह-याजवळ धरली होती. काही वेळातबॅटरी गरम होताच स्फोट झाला.

यात त्याच्या डाव्या गालाला गंभीर दुखापत झाली. घटनेच्यावेळी चिरागचे आजोबा व भाऊ घरी होता. माहिती मिळताच हितेश बन्सोड यांनी त्याला शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉ. मयूर डोंगरे यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. स्फोटामुळे चिरागच्या डोक्याला फारशी इजा झाली नसली तरी डावा कान, घसा व मेंदू प्रभावित झाला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. स्फोट झालेली बॅटरी सुमार दर्जाची व चायना मेड असल्याची माहितीच चिरागच्या वडिलांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत खेळण्याची सवय

चिराग सावनेर शहरातील सुभाष प्राथमिक शाळेत शिकतो. तो यावर्षी इयत्ता चौथीत गेला होता. त्याला ११ वर्षाचा मोठा भाऊ असून, वडील शहरातील वॉटर कुलिंग कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात तर आई घरकाम करते. त्याचे आजोबा रेल्वेत नोकरीला असल्याने ते रेल्वे क्वॉर्टरमध्ये राहतात. चिराग व त्याच्या मोठ्या भावाला इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंसोबत खेळण्याची सवय आहे. वारंवार मनाई करूनही त्यांची ही सवय गेली नाही, अशी माहिती त्याच्या आजोबाने दिली. याच सवयीतून चिराग व त्याच्या भावाने इलेक्ट्रॉनिक्सच्या वेगवेगळ्या वस्तू गोळा केल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *