विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने विदर्भात सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळाला असून शेतकरी सुखावला आहे. भंडारा जिल्ह्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने दडी मारली. अनेक दिवस पाऊस न आल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या. पिके करपण्याची भीती व्यक्त होत होती. अशातच दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे धानपिकाच्या उर्वरित रोवण्यांना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात धो-धो पाऊस बरसला. जिल्ह्यात सर्वाधिक सिंदेवाही तालुक्यात ५९.७, सावली ५७.८, चंद्रपूर तालुक्यात ५४.५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील मुख्य मार्गावर व सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

गोंदिया जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारपासून चार दिवस जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. वर्धा जिल्ह्यात दिवसभर जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, मूंग, उडीद, ज्वारी आदी खरीप पिकांना पावसाने संजीवनी मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील धरणांचा साठा देखील वाढत आहे. जिल्ह्यातील मोर्शी नजीकच्या सिंभोरा धरणात जलसाठा वाढल्याने काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *