बीएसएनएल कार्यालय ते रेल्वे क्रॉसिंग दरम्यान रस्त्याचे बांधकाम कधी?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात खातरोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे रूंदीकरण करून सिमेंट रस्ता बांधण्यात आला. मात्र यातून शितलामाता मंदिरासमोरील बीएसएनएल कार्यालय ते रेल्वे क्रॉसिंग हा अर्धा किलोमीटरचा रस्ता वगळण्यात आला. येथून सततच्या जड, अवजड वाहतुकीमुळे रस्ता वारंवार उखडतो. या रस्त्यावरील खडड्यांमुळे आतापर्यंत डझनभर लोकांचा जीव गेला आहे. मात्र रस्त्याची कायमस्वरूपी रूंदीकरण व सिमेंटीकरण केले जात नसल्याने शासन, प्रशासन आणखी किती बळी घेण्याची वाट पाहत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बीएसएनएल कार्यालय ते रेल्वे कॉसींग पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे यासाठी आंदोलन, निदर्शने, मोर्चे, चक्काजाम, खड्ड्यात धान रोवणी, बेशरमाची झाडे लावण्यासारखे सर्वच प्रयोग करून महामार्ग प्रधिकरणाचा निषेध करण्यात आला. प्रत्येकवेळी लवकरच हा रस्ता तयार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु वर्ष लोटूनही सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. आता याच रस्त्यावरून जलवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आल्याने आधीच खराब असलेला रस्ता पुन्हा उखळण्यात आला. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर पाणी साचून चिखल होतो आणि वाहने घसरणे, मातीत फसणे यासारखे प्रकार दररोज घडतात.

यंदाचा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून येथे लहानमोठा अपघात किंवा सुरळीत वाहतुकीला अडथळा आला नसेल असा एकही दिवस गेला नसावा. यामुळे येथून जाणाड्ढया नागरिकांसह येथे कर्तव्य बजावणा-या वाहतुक पोलिसांचीही नाहक डोकेदुखी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी सुध्दा जिल्हा परिषद, न्यायालय, विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा नागपूरच्या दिशेने जायचे झाल्यास याच रस्त्याने जावे लागते. मात्र लाखो रुपयांच्या आलिशान वाहनाने प्रवास करताना कदाचित खड्यांमधून त्यांना धक्का लागत नसावा. परिणामी सर्वसामान्यांना प्रवाशांना होणारा त्रासाचा अद्याप लोकप्रतिनिधींना समजला नसावा. म्हणून कदाचित या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असतानाही त्याच्या कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी प्रयत्न होत नसावे असे आता नागरिकांकडून बोलले जात आहे. महामार्ग प्रधिकरणाने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी व कायमस्वरूपी रूंदीकरण तथा सिमेंटीकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *