घरफोडीतील मोबाईल वापरणारे चोर अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लाखनी तालुक्यातील केसलवाडा फाटा मार्गावरील रहिवाशी आरती मिलिंद मेश्राम यांच्या घरी १७ जूनला घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे अटोमॅटिक लॉक तोडून चोरी केली होती. या घटनेत सोन्याचे दागीने व मोबाईल चोरीस गेला होता. मोोबाईल लोकेशन ट्रेस करून पोलिस या चोरट्यांपर्यंत कामठीत (नागपूर) पोहचले. तेथून दोघांना अटक केली आहे.

मोहमद शारीक मो. युनूस अन्सारी (२१, हसनबाग, नागपूर) व अब्दुल रहमान सलीम अहमद (१९, बुनकर कॉलनी, कामठी) अशी या दोघांनी नावे आहे. त्यांना ३० आॅगस्ट रोजी कामठी येथून अटक केली. या चोरीतील तिसरा आरोपी मोहम्मद मुबाशीर उर्फ मुज्जमिल (कामठी) हा फरार आहे. अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या या चोरीत २४ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोफ, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ग्रॅमचे सोन्याचे लटकन, १ रेडमी कंपनीचा जुना मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार रुपयाचा माल चोरून नेला होता. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी स्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला होता. अडीच महिन्यापासून हा तपास सुरू होता.

असे फुटले बिंग

या घटनेत चोरून नेलेला रेडमी कंपनीचा जुना मोबाईल चोरटे वापरत होते. सायबर सेलच्या मदतीने या मोबाइलचे लोकेशन ट्रेस करून या चोरीचा छडा लावण्यात लाखनीपोलिसांना यश मिळाले. मोहमद शारीक मो. युनूस अन्सारी व अब्दुल रहमान सलीम अहमद या दोन आरोपींना लोकेशनवरून कामठी येथून अटक केली.

मुद्देमाल हस्तगत नाही

या आरोपीकडून कोणताही मुद्देमाल हस्तगत झाला नाही. या चोरांना कामठी येथून साहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे, पोलीस शिपाई कांतिश कराडे यांनी अटक करून प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत आरोपींची रवानगी करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *