खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! उध्दव ठाकरेंना झटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असे आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असे राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केले आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचे दिसले. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची १९९९ ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलें नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. तसेच निवडणूकआयोगाकडे १९९९ मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध मानता येईल. पण २०१८ मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण नोंदवले. हा निर्णय कार्यकारिणीने घ्यायचा असतो. उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेणे हे लोकशाहीला घातक असल्याचेही ते म्हणाले. आपल्या निकालाचं वाचन सुरु करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. निकाल हा १२०० पानी आहे. त्यातले ठळक मुद्दे त्यांनी आज वाचून दाखवले. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचेही आभार मानले आहेत. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असतो असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

२०१८ ची पदरचना ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नव्हती. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असल्याचा दावाही राहुल नार्वेकर यांनी फेटाळला. तसेच कुणालाही पदावरुन काढण्याचा किंवा पक्षातून हकालपट्टीचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी मान्य करता येत नाही. उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करायचा झाला तर पक्षातल्या कुणालाच त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही. पक्षप्रमुखाला सगळे अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.