साहित्यातून लढण्याची ऊर्जा प्राप्त होते – प्रल्हाद सोनेवाने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुकारामांच्या अभंगापासून ज्ञानेश्वरांच्या ओवीपर्यंत सर्वांनी मानवतेचे गीत गायले. आज याच मानवतेची साखळी जपणारे मतीन भोसले,पारोमिता गोसावी यांच्या संवेदनशील मनामुळे समाजाला बदलाला सुरुवात झाली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्रल्हाद सोनेवाने यांनी केले. वैनाकाठ फाऊंडेशन भंडाराच्या राज्यस्तरीय साहित्य,समाज आणि शिक्षण क्षेत्रातील पुरस्कारांचा वितरण सोहळा स्प्रिंग डेल स्कुलच्या ज्ञानदीप सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी प्रल्हाद सोनेवाने होते. पुरस्कार वितरक म्हणून समीक्षक व लेखक डॉ.प्रमोद मुनघाटे तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ कवी लखनसिंह कटरे, डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांची होती. डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या साहित्य निर्मितीची दशा आणि दिशा,लेखकाच्या निर्मिती मागील प्रेरणा आणि त्यांनी समकाळात घ्यावयाची भूमिका याविषयीचे मत अतिशय परखडपणे मांडले. चंद्रपुरच्या ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी आणि मेळघट येथील शिक्षण कार्यकर्ता मतीन भोसले यांच्या मनोगताने रसिकांच्या काळजाला हात घातला. संतोष आळंजकर, संजीव गिरासे, पल्लवी पंडित, सुनीता सावरकर यांनी साहित्य निर्मिती विषयी मांडलेल्या भूमिकेने आणि मनोगताने कार्यक्रमाने विलक्षण उंची गाठली.

मुकुंदराज काव्य पुरस्कार ‘हंबरवाटा’ काव्यसंग्रहाचे संतोष आळंजकर, संभाजीनगर यांना देण्यात आला. घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार ‘भित्तुक’ कथासंग्रहाचे लेखक संजय गिरासे, धुळे यांना देण्यात आला. ना.रा.शेंडे कादंबरी पुरस्कार ‘काळ’मेकर लाईव्ह’ कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांच्या वतीने डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी स्विकारला डॉ.अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार ‘सफरनामा’ या पुस्तकाच्या लेखिका पल्लवी पंडित, नागपूर यांना,डॉ.आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार ‘ढोर, चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ: सुनीता सावरकर, संभाजीनगर यांना देण्यात आला. महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार चंद्रपुरच्या प्रसिद्ध समाजसेविका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना तर जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार मेळघाट जि.अमरावतीचे मतीन भोसले यांना देण्यात आला.

वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ निवडीचे कार्य प्रा.डॉ.गिरीश सपाटे यांच्या अध्यक्षतेत प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे, प्रा.भगवंत शोभणे, प्रा.डॉ.रेणुकादास उबाळे, प्रसिद्ध समाजसेवक अमृत बन्सोड, अर्चना मोहनकर या तज्ज्ञ समितीने केले. सर्व साहित्य पुरस्काराचे स्वरूप ५००० रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते. महात्मा कालीचरण नंदागवळी समाजसेवक पुरस्कारचे आणि जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्काराचे स्वरूप ११००० रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र होते.ग्रंथ परीक्षण समितीचे सदस्य डॉ.रेणुकादास उबाळे यांनी पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया आणि त्यामागचा हेतू समर्पक शब्दात व्यक्त केला. प्रास्ताविक फाऊंडेशनचे सचिव विवेक कापगते यांनी केले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आकाशवाणीच्या उद्धोषिका वीणा डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नरेश अंबिलकर यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन डॉ.जयश्री सातोकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रमोदकुमार अणेराव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाला ईश्वर नाकाडे, सौ.शोभा मिरासे, डॉ.विद्या ठवकर, संजय जांभुळकर, श्रीमती सुनिता नितनवरे, मृणाल हुमणे, रोहित भोंगाडे, संवेदना कापगते, सौ.विजया अणेराव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी मनोहर बारसकर, कॉ.सदानंद इलमे, विठ्ठल सार्वे, डॉ.दशरथ कापगते, प्रा.अजिंक्य भांडारकर, डॉ.मुक्ता आगासे, चोपराम गडपायले, शामली नाकाडे, प्रा.खांदवे, राम बागडे, मंगला गणवीर, मनोज केवट आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *