नूतन कन्या शाळेचा वार्षिकोत्सव सोहळा थाटात संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नूतन कन्या शाळा ही लयास चाललेल्या संस्कृतीला पुनर्जिवित करणारी, वेगवान जागतिक स्पर्धेत माणुसकी जपणारी आणि अश्रूंमध्येही आनंद फुलविणारी शैक्षणिक संस्था असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध समाजसेवक व समुपदेशक डॉ. संध्या पवार यांनी काढले. नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून डॉ. संध्या पवार, संयोजिका, पालक मैत्री, समाजसेवक, लेखक, साहित्यिक, समुपदेशक व नागपूर येथील अल्कोहोलिक अनॉनिमस संस्थेच्या विश्वस्त मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू गर्ल्स स्कूलचे अध्यक्ष अ‍ॅड. एम. एल. भुरे होते. कार्यक्रमप्रसंगी शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प.भंडारा यांनी प्रमुख अतिथींचे स्थान भूषविले. संस्थेचे सचिव शेखर बोरसे, कार्यकारिणी सदस्य सौ. रेखा पनके यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्राचार्य निलु तिडके मंचावर उपस्थित होत्या. उद्घाटनपर भाषणात डॉ. संध्या पवार यांनी नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनी कला, विज्ञान, कौशल्य, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात केवळ स्थानिकच नव्हे तर राज्य पातळीवर उल्लेखनीय यश मिळवत असल्याचे सांगितले. ही शाळा विद्यार्थिनींना केवळ शिक्षण देत नाही तर त्यांना संवेदनशील, सहृदय आणि जबाबदार नागरिक घडवते, असे त्यांनी मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून अ‍ॅड.भुरे यांनी विद्याशक्ती जागृत ठेवण्याकरिता इच्छाशक्ती व क्रियाशक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये यांनी शाळेची उज्ज्वल परंपरा आणि सातत्यपूर्ण यशाचे कौतुक करून विदयार्थिनींना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सचिव शेखर बोरसे यांनी ही शाळा मातृशक्तीला स्वाभिमानी आणि सक्षम बनवणारी असल्याचे सांगितले, तर रेखा पनके यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व शाळेची उज्ज्वल परंपरा कायम असल्याचे प्रतिपादन करुन समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकातून प्राचार्य निलु तिडके यांनी नूतन कन्या शाळा हे पुनित विद्यामंदिर असून येथील शिक्षक व विद्यार्थिनी ज्ञानदिंडीचे वारकरी असल्याचे प्रतिपादन करून शैक्षणिक यशप्रवासावर प्रकाश टाकला. शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कौशल्याधिष्ठित शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्कार व नैतिकतेची जोपासना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ‘कलिका’ या भाषा व प्रथमच विद्यार्थिनींनी तयार केलेल्या गणित -विज्ञान हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कला, विज्ञान, गृहविज्ञान, इतिहास, भूगोल प्रदर्शन तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत स्वयंपाकगृह नूतनीकरणाचे उद्घाटनही करण्यात आले. विद्यार्थिनींनी गणेश वंदना, गोंधळ, लोककला आणि शिवकालीन सांकेतिक भाषेवर आधारित सादरीकरण व गीतगायनातून उपस्थितांची मने जिंकली. नारायणी गिºहे व स्वरा मुनीश्वर या विद्यार्थिनींनी शाळेचा वार्षिक अहवाल नाट्यमय शैलीत सादर केला. याप्रसंगी वार्षिकोत्सव प्रभारी शिक्षिका स्नेहा निमकर तसेच शाळा नायिका पल्लवी बाभरे व शाळाउपनायिका अंजली काळे मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ईशा समरीत हिने केले. आभार शाळेचे उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर यांनी मानले. वार्षिकोत्सवाच्या यशस्वीतेकरिता पर्यवेक्षक द्वय श्रद्धा रामेकर व प्रिया ब्राह्मणकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *