
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या ठाम भूमिकेला यश येत शुक्रवार रोजी कृषी बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश प्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत. माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन, मोहाडी व तुमसर तालुक्यासाठी एकमेव असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
शासनाने मंजूर केलेले खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाºयांकडून शासकीय हमी भावापेक्षा कमी, सुमारे १८०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दराने धान खरेदी केली जात असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. यापूर्वीही याबाबत तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यावर्षीही शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असून, हे प्रकार तात्काळ थांबवावेत व शेतकºयांना किमान हमी भाव मिळावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तसेच ५ दिवसांत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तत्काळ हालचाली करत कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश संबंधित बाजार समितीला दिले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून, माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वातील या प्रयत्नाला यश आल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे