
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: उमरेड -कºहांडला- पवनी वन्य जीव अभयारण्य अंतर्गत पवनी तालुक्यातील आठ गावांतील पुनर्वसन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. पवनी तहसिल कार्यालय येथे आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधीकारी माधुरी तिखे,पवनी तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळेस उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पांतर्गत गावनिहाय पुनर्वसन पॅकेज रचना, जमीन मोजणी, पुनर्वसन प्रक्रिया, नुकसानभरपाई तसेच इतर प्रशासकीय कामे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करा असे आदेश् तहसीलदार यांना दिले. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण योजना व मातोश्री पांदण योजना अंतर्गत सुमारे १७०० किमीचा डीपीआर तयार करण्यात आलेला असून, त्यामध्ये भंडारा ९४ गावे तसेच पवनी तालुक्यातील ७९ गावांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी‘गाव तिथे पांदण रस्ते’ योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. सर्व संबंधित विभाग व यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रकल्पबाधित नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा उद्देश असून, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने पुनर्वसन, नुकसानभरपाई व विकासकामांची कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले.