आकाशातून अचानक पडलेल्या दोन रहस्यमय वस्तूंमुळे नागरिक भयभीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : निसर्गाच्या अनाकलनीय घटनांनी मानवाला नेहमीच चकित केले आहे, मात्र भंडारा जिल्ह्यातील परसोडी परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. आकाशातून अचानक पडलेल्या दोन रहस्यमय वस्तूंमुळे नागरिक भयभीत झाले असून, या घटनेने वैज्ञानिक कुतूहलही जागे केले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा या वस्तू पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आल्या. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, परसोडी येथील सुगत बौद्ध विहार परिसरात राहणारे किशोर रमेश वाहने (वय ५० वर्षे) यांनी या घटनेची अधिकृत माहिती पोलीस ठाण्यात दिली आहे.

घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या सुमारास घडली. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या ले-आउटच्या जागेत काही लहान मुले थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून विस्तव शेकत बसली होती. त्याच वेळी, अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. बघता बघता, अर्ध्या विटेच्या आकाराचे, सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले. हे तुकडे पडताना जळत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा आवाज फारसा झाला नाही. सुदैवाने, हे तुकडे मुलांच्या अंगावर न पडता जवळच पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच परिसरातील कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

सदर वस्तू मुलांनी सकाळी किशोर रमेश वाहने यांना दाखवल्या. त्यांनी या वस्तूंची पाहणी केली असता, त्या दिसायला सिमेंटच्या रंगाच्या परंतु वजनाला अत्यंत हलक्या असल्याचे दिसून आले. आकाशातून पडलेली कोणतीही वस्तू सामान्यत: धातूची किंवा दगडाची (उल्का) असते, मात्र या वस्तूंचे ‘हलके वजन’ हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे. किशोर रमेश वाहने यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हेदोन्ही तुकडे पोलीस ठाण्यात जमा केले. पोलिस ठाण्याचे पोलीस हवालीदार शिंगाडे आणि ठाणेदार भिमाजी पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनेची नोंद घेतली आहे. प्राथमिक तपासात या वस्तू मानवनिर्मित उपग्रहाचा ढिगारा आहेत की नैसर्गिक उल्कापाताचा भाग, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *