
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील विद्या नगर परिसरासमोर आज रविवारी पहाटे वृत्तपत्र टाकणारे शंकर भोजलाल पटले यांचे अपघाती निधन झाले. नेहमीप्रमाणे मोटार सायकलने वृत्तपत्र वितरणाचे काम आटोपून भोजापूरकडे जात असताना नागपूर कडून विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करणाºया भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून पळ काढून थेट बीटीबी मंडी येथे माल खाली करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात शंकर पटले यांचा जागीच मृत्यू झाला तसेच शंकर पटले यांच्या टीव्हीएस स्कुटी (एमएच ३६ एएस २४७०) या गाडीचा चुराडा झाला.
या ‘हिट अँड रन’ प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई होऊ नये आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाणे, गांधी चौक, भंडारा येथे सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेब पोर्टल, यूट्यूब पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य एकत्र आले. आरोपी ट्रकचा लवकरात लवकर छडा लावून चालकाला जेरबंद करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक ठवकर यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, संशयित ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथक लाखनीकडे रवाना करण्यात आले असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मृतक शंकर पटले यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. त्यांनी नुकतेच कुटुंबासाठी एक वाहन विकत घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वृत्तपत्र विक्रेता आणि पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.