
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील शासकीय कंत्राट वाटप प्रक्रियेत मोठया प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असुन त्यामुळे ठराविक कंत्राटदारांनाच कामे दिली जात आहेत.त्यामुळे छोटे कंत्राटदार अडचणीत आले असुन नियमांना डावलुन कामे वाटप होत आहेत.तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवुन योग्य कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील कंत्राटदारांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व इतर शासकीय कंत्राटदारांना नियमानुसार कामे न देता राजकीय हस्तक्षेप व पक्षपात केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शासनाच्या ठरविलेल्या प्रमाणानुसार कामे वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. तसेच विविध योजनांअंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची थकीत बिले दीर्घकाळापासून अदा न झाल्याने कंत्राटदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतेही लेखी कारण न देता देयकांमध्ये विलंब केला जात असून यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांच्या वतीने मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही या दरम्यान देण्यात आला. १० लाखांपर्यंतची कामे मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा शासन निर्णय असतानाही कामांचे एकत्रीकरण (क्लबिंग) करून मोठ्या कंत्राटदारांना लाभ दिला जात असल्याने छोट्या कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.