
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाºया तकिया वॉर्डमध्ये सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी अखेर नगर परिषद भंडारा हरकत घेत कारवाईच्या दिशेने पुढे सरकली आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि बी.एस. क्राईम इंडिया न्यूजचे संपादक शमशेर खान यांनी जिल्हाधिकारी व नगर परिषदेकडे दिलेल्या लेखी तक्रारीनंतर नगर परिषदेने संबंधित अतिक्रमणकर्त्यांना सात दिवसांत अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे.
नगर परिषदेच्या माहितीनुसार, तकिया वॉर्डमधील प्लॉट क्रमांक १९ व २० समोरील नगर परिषदेच्या सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टीन शेड तसेच पक्के बांधकाम करण्यात आले आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळेरस्ता अडविला जात असून वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
हे बांधकाम महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाचे सरळ उल्लंघन असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये संबंधित व्यक्तींना सात दिवसांच्या आत संपूर्ण अवैध बांधकाम हटवून सार्वजनिक रस्ता मोकळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा नगर परिषद स्वत: कारवाई करून बांधकाम पाडणार असून, त्याचा खर्च तसेच कायदेशीर कारवाई अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केली जाणार आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम १७९ व १८९ (८)(१) तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५३ अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.
या तरतुदींनुसार अवैध बांधकाम पाडणे, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे. या कारवाईमुळे शहरात चचेर्ला उधाण आले असून, सात दिवसांची मुदत संपल्यानंतर नगर परिषद प्रत्यक्षात बुलडोजर कारवाई करणार की रसूखदारांसमोर कायदा नरमावणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बी.एस. क्राईम इंडिया न्यूज या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून, पुढील घडामोडी जनतेसमोर मांडणार असल्याचे संपादक शमशेर खान यांनी स्पष्ट केले आहे.